बांधाच्या वादाला कंटाळून शेतकरी महिलेने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 13:19 IST2019-12-07T13:18:26+5:302019-12-07T13:19:39+5:30
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बांधाच्या वादाला कंटाळून शेतकरी महिलेने संपवले जीवन
गंगामसला (जि. बीड) : शेजारी असलेल्या शेतकऱ्यासोबत सतत शेताच्या बांधावरून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मीरा लक्ष्मण पवार (३२) या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथे ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्नाथडी येथील लक्ष्मण मारोती पवार व मीरा लक्ष्मण पवार या शेतकरी दाम्पत्याचे याच गावातील अशोक सुखदेव डाके, मीरा अशोक डाके, योगेश अशोक डाके, सचिन अशोक डाके यांच्यासोबत सोन्नाथडी शिवारातील बरड येथील शेतातील बांधावरून नेहमीच भांडणं होत होते. सततच शेतातील बांधाच्या कारणावरुन कुरापती काढून भांडण व मानसिक त्रास होत असल्याने मीरा पवार यांनी ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास सोन्नाथडी शिवारात विहिरीत उडी मारून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. मयत महिलेचे पती लक्ष्मण मारुती पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत अशोक सुखदेव डाके, मीरा अशोक डाके, योगेश अशोक डाके, सचिन अशोक डाके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके हे करीत आहेत.