बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:45 IST2025-05-09T12:44:30+5:302025-05-09T12:45:40+5:30
आरोपींनी १० दिवसांपूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आरटीओसारखी बनविली.

बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात
बीड : शहरापासून जवळच असलेल्या बीडबायपास रोडजवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) असल्याचे सांगून वाहनधारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाईल, वाहन, नगदी रक्कम असा एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला.
अजय बालाजी गाडगे (रा. अमृत नगर, डगलॅड, खंडोबा टेकडी, घाटकोपर, मुंबई) व दिनेश मंगल धनसर (रा. पांडुरंग वकीलवाडी, कलीना, मुंबई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना बुधवारी सकाळी माहिती मिळाली की, बीड बायपास रोडवर एक जीप उभी असून, त्यावर आरटीओचा लोगो व दिवा आहे. आरटीओ अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून दोघेजण येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून वाहनांची कागदपत्रे तपासून आम्ही आरटीओ असल्याचे सांगून पैसे वसूल करीत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांच्याकडील वाहनाची माहिती घेतली असता ते वाहन ठाणे आरटीओ विभागात असल्याचे समजले. त्यावरून एमएच-०४ केआर-६४०४ या जीपवर आरटीओचा लोगो, स्टीकर लावून आरटीओ असल्याची बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे वसूल करीत असल्याची खात्री झाली. त्यावरून बीड ग्रामीण ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी तक्रार दिली. त्यावरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
तलवाडा फाट्यावर
गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथे बनावट आरटीओ वाहन उभे असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पोलिस गेले असता बनावट आरटीओ वाहनात दोघेजण बसले होते. त्यांची चौकशी केली असता अजय राजाराम सूर्यवंशी, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वडाळा अशी ओळख सांगितली, तर ड्रायव्हरने दिनेश मंगल धनसर असे नाव सांगितले. ओळखपत्राबाबत विचारणा केली असता धनसर हा पोलिसांना धक्का देऊन पळून जाऊ लागला. पाठलाग करून दोघांना पकडले असता खरे नाव अजय बालाजी गाडगे असल्याचे सांगितले.
१० दिवसांपूर्वी जीप खरेदी
१० दिवसांपूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आरटीओसारखी बनविली. ते वाहन घेऊन नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर व बीड येथे वाहन अडवून त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतल्याचे कबूल केले. त्या दोघांकडून एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पोलिस हवालदार मनोज वाघ, कैलास ठोंबरे, पोलिस नाईक विकास वाघमारे, चालक शिवाजी खवतड यांनी केली.