मुदतवाढ मिळाली, विद्यार्थ्यांनो स्वाधारसाठी करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:09 IST2025-03-07T19:08:38+5:302025-03-07T19:09:04+5:30
त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज करावा लागेल सबमीट

मुदतवाढ मिळाली, विद्यार्थ्यांनो स्वाधारसाठी करा अर्ज
बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत दाखल करणे आवश्यक आहे. hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत अर्ज दाखल करता येतो. या योजनेचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना होताे. सदरील योजनेंतर्गत अकरावी व बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालयांत, शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जात आहे. दरम्यान, स्वाधार योजनेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांसह इतर कारणांवरून स्वाधार योजनेसाठी मुदतवाढ करण्याची विनंती विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती. त्यानुसार, १५ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना?
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१६-१७ पासून सुरू केली आहे.
कागदपत्रे काय लागतात?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँक पासबुक, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, प्रवेशित विद्यालयाचे बोनाफाईड, मार्क मेमो, शाळा सोडल्याचा दाखला, हजेरी पत्रक अशी विविध कागदपत्रे द्यावी लागतात.
अर्जाची स्थिती तपासावी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, अर्जात काही त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्याच्या लॉगीनला पाठविले जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये अर्जाची स्थिती तपासावी. काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करुन पुन्हा अर्ज सबमीट करावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनला जाऊन बँक तपशील भरावा.
- प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड