बीडमध्ये कामचुकार डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:16 IST2021-05-23T09:16:10+5:302021-05-23T09:16:46+5:30
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे.

बीडमध्ये कामचुकार डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
बीड : आष्टी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्यानंतर शनिवारी पहाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी आष्टी गाठत तपासणी केली. यावेळी अस्वच्छता, उपचारांतही हलगर्जी होत असल्याचेे लक्षात येताच पवार यांनी तत्काळ डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे. ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे नाहीत अथवा कमी आहेत, अशांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. येथेही डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयची नियुक्ती केलेली आहे; परंतु आष्टी कोविड सेंटरमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच उपचारांकडेही डॉक्टर दुर्लक्ष करीत होते. याची दखल घेत डॉ. पवार यांनी भल्या पहाटे तपासणी केली असता त्यांना उपचारांमध्ये हलगर्जीपणा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ डॉ. माधुरी पाचरणे या डॉक्टरसह अश्विनी पांतावणे, रूपाली काळे या परिचारिका आणि चार वॉर्डबॉयची हकालपट्टी केली. त्यानंतर या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. या कारवाईने इतर कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना महामारीत कोणी हलगर्जी करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. चांगले काम केल्यास पाठीवर थाप असेल अन्यथा कारवाई करण्यात येईल. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड