शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळ्याने खळबळ; नातेवाईकांचा हत्या झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 19:56 IST2023-01-28T19:50:58+5:302023-01-28T19:56:41+5:30
ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळ्याने खळबळ; नातेवाईकांचा हत्या झाल्याचा आरोप
गेवराई (बीड): तालुक्यातील देवपिंपरी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला अवस्थेत आज दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.
बंडू सखाराम सुरनर असे मृताचे नाव आहे. बंडू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातून जाण्याच्या रागातून शेजाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बंडू सखाराम सुरनर व मुलगा भैयासाहेब यांना लक्ष्मण गवारे, अदित्य गवारे, विष्णू नलावडे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीसांनी तक्रार घेतली नाही. रस्त्याच्या वादातूनच बंडू यांची तिघांनी मिळून गळफास देत हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेची मागणी केली. तोपर्यंत मृतदेह खाली उतरला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
दरम्यान, गेवराई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणला. येथेही आक्रमक होत नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले. मध्यस्थीनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.