'दिवसाची सुरुवात तुमच्यापासूनच, पप्पा मिस यू!'; महादेव मुंडेंचे मारेकरी दोन वर्षांनंतरही मोकाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:41 IST2025-11-04T16:40:34+5:302025-11-04T16:41:19+5:30
परळीतील महादेव मुंडे यांच्या मुलाचे भावनिक स्टेट्स; हत्या होऊन दोन वर्षांनंतरही मारेकरी मोकाटच

'दिवसाची सुरुवात तुमच्यापासूनच, पप्पा मिस यू!'; महादेव मुंडेंचे मारेकरी दोन वर्षांनंतरही मोकाटच
बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेला आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला असतानाही त्यांचे मारेकरी अजूनही मोकाटच असल्याने मुंडे कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच, महादेव मुंडे यांच्या मुलाने सोशल मीडियावर टाकलेले भावनिक स्टेट्स पाहून मन हेलावून गेले आहे.
महादेव मुंडे यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी स्टेट्स ठेवले आहे. वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत, “प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यानेच होते, पप्पा मिस यू!’ असे भावनिक शब्द त्याने लिहिले आहेत. या स्टेट्सवरून वडिलांच्या आठवणीने मुलाला होत असलेल्या वेदना स्पष्टपणे दिसून येतात. कुटुंबाचा आधार हरपला असताना, आरोपी मोकाट असल्याने कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची तीव्रता वाढली आहे.
एसआयटी नियुक्ती; पण तपास थंड
महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्रशासनाने आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले होते; मात्र एसआयटी नियुक्त होऊनही तपासाची गती अजूनही अपेक्षेनुसार वाढलेली नाही. या प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
कुटुंबाला न्यायाची तीव्र प्रतीक्षा
महादेव मुंडे यांची हत्या नेमकी कशासाठी झाली? या हत्येमागे कोणाचा हात आहे? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत. न्याय मिळेल या आशेवर मुंडे कुटुंबीय दिवस काढत आहेत. मुलाचे हे भावनिक स्टेटस न्याय यंत्रणेला आणि प्रशासनाला तपास तातडीने पूर्ण करण्याची आणि कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची गरज अधोरेखित करते.
बीड येथील स्व. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांची भेट घेतली. गेली अनेक महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या खूनाचा तपास सुरु आहे. परंतु अद्यापही एकाही मारेकऱ्याला गजाआड करण्यात आले नाही. यासाठी ज्ञानेश्वरीताई सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्यात आम्ही सर्वजण… pic.twitter.com/jUWTnVt1RN
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2025
सुप्रिया सुळेंसमोर ज्ञानेश्वरी मुंडे भावुक
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबाची भेट घेतली. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही तपास न लागल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्याला न्याय मिळत नसल्याने ज्ञानेश्वरी मुंडे भावुक झाल्या हाेत्या. यापूर्वी ज्ञानेश्वरी यांनी न्यायासाठी विषारी द्रव प्राशन करून आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता. त्यानंतरही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेता आलेला नाही.