आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, बँक अधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:42 IST2025-10-30T19:41:40+5:302025-10-30T19:42:01+5:30
आरोग्य केंद्राच्या निधीतही 'हातसफाई'! बीडमध्ये आरोग्य सेविका आणि डॉक्टरांवर गंभीर फसवणुकीचा गुन्हा

आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, बँक अधिकाऱ्यावर गुन्हा
- मधुकर सिरसट
केज (बीड): सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठी मंजूर झालेला ₹ १ लाख १६ हजार ६९४ चा निधी अधिकार नसताना परस्पर उचलल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सन २०२४ या वर्षात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इस्थळसाठी बळकटीकरणाचा निधी बँक खात्यात जमा झाला होता. या खात्यातून रक्कम काढण्याचा अधिकार इस्थळचे सरपंच आणि तात्कालीन आरोग्य सेविका (श्रीमती रेड्डी) यांना होता. मात्र, श्रीमती रेड्डी यांची बदली झाल्यानंतर आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांना रक्कम काढण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. तरीही, आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांनी दि. १३ जून २०२४ रोजी आयडीबीआय बँकेच्या बनसारोळा शाखेतून ही संपूर्ण रक्कम काढल्याचे चौकशीत उघड झाले.
संगनमत आणि फसवणूक
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केलेल्या सखोल चौकशीत, मनीषा पानसरे यांनी बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांच्या सांगण्यावरून आणि आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी (अज्ञात) यांच्याशी संगनमत करून सदर शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी संगनमत करून शासनाची १ लाख १६ हजार ६९४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बँक अधिकाऱ्यांचा दावा: आम्हाला विनाकारण गोवले
या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी मात्र वेगळा दावा केला आहे. आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी दीपक कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा पानसरे यांना रक्कम देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत सही नमुना बदलण्याचा अर्ज, चेक, ओळखपत्र आणि रक्कम देण्याचे पत्र बँकेकडे देण्यात आले होते. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून खात्री करूनच रक्कम देण्यात आली होती. बँकेकडे सर्व पुरावे असतानाही आपल्याला विनाकारण गोवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.