प्रभाव लोकमतचा : ...अखेर आष्टी पोलिसांनी ‘त्या’ टेम्पो चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:44 IST2019-03-15T18:42:52+5:302019-03-15T18:44:14+5:30
खडकत मांस प्रकरण : चुकीचा क्रमांक टाकून गैरवापर करण्याचा प्रयत्न उघड

प्रभाव लोकमतचा : ...अखेर आष्टी पोलिसांनी ‘त्या’ टेम्पो चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
बीड : आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सेम क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना मिळून आला होता. मात्र तो टेम्पो कोणाचा? याचा तपास लावण्यात आष्टी पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. लोकमतने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनास आणल्यानंतर वरिष्ठांच्या दबावापुढे या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चुकीचा क्रमांक टाकून गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे यातून उघड झाले आहे.
अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे यांनी खडकत येथील विनापरवाना चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक टेम्पो (एमएच ४२ एक्यू ९८२५) असा १० लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई १ फेबु्रवारी रोजी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात सेम क्रमांकाचा (एमएच ४२ एक्यू ९८२५) टेम्पो पोलिसांना मिळून आला. प्रत्यक्षात मात्र टेम्पो बदलाबदल करण्याच ‘डाव’ होता. मात्र ४ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे पोलिसांनी बनवाबनवी करून हा टेम्पो सापडल्याची नोंद केली.
दरम्यान, दीड महिन्यानंतरही हा टेम्पो कोणाचा? याचा तपास लावून कारवाई करण्यास आष्टी पोलीस ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत होते. हाच धागा पकडून लोकमतने १४ मार्च रोजी पुन्हा वृत्त प्रकाशित केले. पोलिसांनी तपासाकडे दुर्लक्ष केल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीध अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी याची चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या काही तासांत आष्टी पोलिसांनी याचा तपास पूर्ण केला आणि दुसरा टेम्पो मालक मुन्नू नजीर पठाण (रा.खडकत ता.आष्टी) याच्यावर शासण व प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार पोना अशोक केदार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.