पेट्रोल पंपावर पहाटेच्या दरम्यान चोरी; सीसीटीव्ही बंद करत गल्यातील ४ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 19:36 IST2023-07-31T19:36:27+5:302023-07-31T19:36:53+5:30
घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी भेट दिली असून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल पंपावर पहाटेच्या दरम्यान चोरी; सीसीटीव्ही बंद करत गल्यातील ४ लाख लंपास
- नितीन कांबळे
कडा - सीसीटीव्ही सिस्टम बंद करून चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या गल्यातील ३ लाख ९५ हजार रूपयांवर डल्ला मारल्याची घटना उंदरखेल येथे आज पहाटेच्या दरम्यान घडली. घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी भेट दिली असून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील सागर चंद्रकांत शेकडे यांचा बीड नगर राज्य महामार्गावर उंदरखेल शिवारात एच.पी.चा पेट्रोल पंप आहे. सोमवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी पंपावरील सीसीटीव्ही सिस्टम बंद करून कॅबीनमध्ये प्रवेश केला. कॅबीनमध्ये शनिवार, रविवार दोन दिवसांचा ३ लाख ९५ रूपये असा गल्ला होता. चोरट्यांनी सर्व रक्कम लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतिश पैठणे यांनी भेट दिली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात पेट्रोल पंप मालक सागर चंद्रकांत शेकडे याच्या फिर्यादीवरून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.