शेतकऱ्याचा टाहो! अतिवृष्टीने नदीचे पाणी शेतात घुसले, ३ एकरवरील कोबी पिक वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:57 IST2022-10-21T17:56:05+5:302022-10-21T17:57:02+5:30
दिवाळीत दिवाळ निघाले, काढायला आलेल पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर

शेतकऱ्याचा टाहो! अतिवृष्टीने नदीचे पाणी शेतात घुसले, ३ एकरवरील कोबी पिक वाहून गेले
परळी (बीड) : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सेलू येथील नदीचे पात्र फुठून पाणी शेतात घुसले. यामुळे तीन एकरवरील फुलकोबीचे पिक वाहून गेल्याने शेतकरी नामदेव कणसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलकोबीचे पीक काढायला आले होते. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ३ एकरवरील फुलकोबी पाण्यात वाहून गेली. त्यावर केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
परळी तालुक्यातील सेलू परिसरात नामदेव कणसे यांची सात एकर शेत जमीन आहे. पैकी ३ एकर जमिनीवर त्यांनी फुलकोबीचे पिक घेतले. यासाठी ड्रीप, पाईपलाईन, फवारणीचा खर्च केला. कर्ज काढून त्यांनी जमीन पीकवली होती. तर उरलेल्या चार एकर मध्ये सोयाबीन व कापूस घेतले होते. हे सर्व पिके गुरुवारी रात्री झालेल्या पावसात वाहून गेले आहेत.
दिवाळीत दिवाळ निघाले
शेतकरी नामदेव कणसे म्हणतात की, आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरत आहे. आम्ही आणखी दिवाळीचे सामान भरले नाही. आता जमिनीवर केलेला खर्च कसा भरून निघणार, असा प्रश्न पडला असल्याचे कणसे म्हणाले. फुलकोबी खरेदीसाठी गंगाखेड,परळी येथून व्यापारी पाहणी करून गेले होते, परंतु, हे सर्व पिके पावसाने नष्ट झाल्याने शेतकरी कणसे यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.