बीडमध्ये लेखणी बंदमुळे ‘महसूल’ची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:16 IST2018-07-01T00:15:44+5:302018-07-01T00:16:15+5:30

बीडमध्ये लेखणी बंदमुळे ‘महसूल’ची कामे ठप्प
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांनी ट्रॅक्टरमधून ओढून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. त्यामुळे जनतेची व प्रशासकीय पातळीवरील सर्वच कामे खोळंबली.
सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एकवटले. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तलाठी आमलेकर मारहाणीतील तसेच तलाठी कमलेश सुरावार यांना धमकी देणाºया आरोपींना अटक करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात झाली.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रवीण धरमकर, सुनील भुताळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, अविनाश शिंगटे, हिरामण झिरवाळ, सुनील पवार, कोषागार अधिकारी एस. जी. भुतडा, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर राख, चंद्रकांत जोगदंड, सरचिटणीस महादेव चौरे, जयंत तळीखेडे, मध्यवर्ती संघटनेचे नवनाथ नागरगोज, राहुल शेट्टे, कोतवाल संघटनेचे अरविंद राऊत, तलाठी संघटनेचे अनिल सुत्रे, इंद्रजित शेंदूरकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१३०० अधिकारी, कर्मचाºयांचे आंदोलन
जिल्ह्यातील २ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, ५ उपविभागीय कार्यालये, ११ तहसील कार्यालये, ३ भूसंपादन कार्यालय, १ पुरवठा कार्यालय, भुसुधार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास ८० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी असे १३०० जण लेखणीबंद आंदोलनात सहभागी झाले.
या आंदोलनामुळे नेहमी वर्दळ असणाºया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. सध्या शैक्षणिक प्रवेशाचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र, दाखले मिळू शकले नाहीत. प्रशासकीय पातळीवरील आणि विविध प्रकरणांतील सुनावणीची कामे होऊ शकली नाहीत.