'...नादी लागू नकोस', पुण्यात हत्या झालेल्या बालाजी अन् महिलेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:15 IST2025-01-24T13:14:33+5:302025-01-24T13:15:11+5:30
दिंद्रूडच्या बालाजीची पिंपरी चिंचवडमध्ये झाली होती हत्या

'...नादी लागू नकोस', पुण्यात हत्या झालेल्या बालाजी अन् महिलेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
दिंद्रुड (बीड) : माजलगाव तालुक्यातील तरुणाची पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात १७ जानेवारी रोजी निर्घृण हत्या झाली. यात मयत बालाजी व पुणे येथील एका महिलेची कथित कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब उर्फ बालाजी मंचक लांडे (रा. दिंद्रुड ता. माजलगाव) या तरुणाची पुण्याचा चिखली भागातील भातनासे परिवारासोबत ओळख होती. रेखा विश्वंभर भातनासे या महिलेकडे बालाजी पुण्यात रोजंदारीच्या कामाला असताना सतत जायचा. याच दरम्यान रेखाच्या अल्पवयीन मुलीसोबत बालाजीचे प्रेम संबंध जुळल्याची माहिती आहे. ही बाब रेखाला समजल्यानंतर तिने तिच्या प्रियकराकरवी माझ्या मुलीचा नाद सोड म्हणून बालाजीला धमक्या दिल्या होत्या.
मुलीच्या मोबाइलमधील माझा नंबर का ब्लॉक केला, अशी विचारणा बालाजीने मामी म्हणवणाऱ्या रेखाकडे केल्याचे कॉल रेकॉर्डिंगवरून निदर्शनास येत आहे. माझ्या मुलीच्या नादी लागू नकोस, असे म्हणून बालाजीला रेखा भातनासे धमकावत असल्याचे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे. बालाजीने १७ तारखेला तिच्या घरी जाणार असल्याचे तिच्या आईला फोनवरून सांगितले होते. नंतर त्याचा मोबाइल बंद झाला.
१७ तारखेला अपघाताचा बनाव करून गंभीर जखमी बालाजीला पिंपरी चिंचवड भागातील रुग्णालयात दोन तरुणांनी दाखल केले होते. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने त्याला केलेली मारहाण व त्याचा मृत्यूही रेखा भातनासे व तिच्यासोबत असणाऱ्यांनी केली असल्याचे मत मयत बालाजीच्या परिवाराने व्यक्त केले आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगने खळबळ उडाली असून याची पुष्टी करत नाहीत. आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी बालाजीच्या आईने केली आहे.