मेडिकल शॉपमधील आगीत होरपळून डॉक्टरांचा मृत्यू; कंपाउंडर गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:24 IST2020-06-08T13:24:06+5:302020-06-08T13:24:35+5:30
गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथील घटना

मेडिकल शॉपमधील आगीत होरपळून डॉक्टरांचा मृत्यू; कंपाउंडर गंभीर जखमी
गेवराई : तालुक्यातील तलवाडा फाटा येथील एका मेडिकल शॉपला लागलेल्या आगीत होरपळून डॉक्टरांचामृत्यू झाला असून कंपाउंडर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री २ वाजेच्या दरम्यान झाली असून आगीमुळे मेडिकल शॉप जळुन खाक झाले आहे. डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले असे मृत डॉक्टरांचे नाव आहे.
बागपिंपळगाव येथील डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा तलवाडा फाटा येथे एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर दवाखाना आहे. दवाखान्या शेजारीच मेडिकल शॉप आहे. रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास येथील मेडिकल शॉपला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यावेळी मेडिकल शॉपमध्ये डॉ. चोरमले आणि कंपाउंडर सुनील माळी हे गंभीर जखमी अवस्थेत तेथे आढळून आले. पोलिसांनी लागलीच त्यांना उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉ. चोरमले यांचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. तर कंपाउंडर माळी यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भीषण आगीमुळे फ्रीजचा स्फोट झाल्याने मेडिकल शॉप जळून खाक झाले आहे. या स्फोटामध्येच होरपळून डॉक्टर चोरमले आणि कंपाउंडर माळी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोलिस गणेश तळेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.