अंबाजोगाई : शेतात काम करण्यासाठी सालगडी म्हणून नोकर ठेवण्याची पारंपारिक पद्धत आजही अंबाजोगाई तालुक्यात अस्तित्वात आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सालगडयाचा वार्षिक मोबदला ठरविला जातो. यावर्षी सालगडयांचा वार्षिक भाव एक ते सव्वा लाखांवर ठराव केला जात आहे. शिवाय प्रत्येकी पन्नास किलो गहू, ज्वारी आणि शेतात राहण्याची सोय केली जात आहे. अचानकच सालगडयाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात सालगडी हे गावातीलच असतात. मात्र, आता परजिल्ह्यातून व आदिवासी भागातून मजूर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. परिसरातील गावांमध्ये बहुतांश सालगडी परजिल्ह्यातील आहेत. तर काही ठिकाणी पंधरा ते वीस वर्षांपासून येथेच अनेक लोक वास्तव्यास आलेले आहेत. ते तालुक्यातच रहिवासी झाले आहेत. गावातून सालगडी मोजकेच मिळतात. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या सालगडयांना शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. तालुक्यात ग्रीन बेल्ट असणाऱ्या भागामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उसाला पाणी देण्यासाठी मजुरांची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय हा भाग सुपीक व सधन असल्याने इथे सालगडयांना सव्वा लाखांच्या घरात वार्षिक मोबदला दिला जातो. त्या तुलनेत डोंगराळ भागात शेतकऱ्यांना उत्पादन मर्यादित होते. शिवाय डोंगराळ भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणात विविध साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी जातात. त्यामुळे डोंगराळ भागात शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाही. जे मजूर मिळतात. त्यांच्यासाठी मोठा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागतो. शेतीमधील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थितीत बेताचीच राहते. अशा स्थितीत गडी न ठेवता स्वत:च शेती कसण्याकडे अनेकांचा भर आहे.
उचल म्हणून ५० टक्के रक्कम
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बोलणी झाल्यानंतर तातडीने संबंधित सालगडयाला उचल म्हणून ठरलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम द्यावी लागते. शिवाय शेतात कुटुंबासह राहण्याची सोय करावी लागते. सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने मिळेल त्या सालगडयाला मोबदला देऊन गुंतवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.