सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 18:33 IST2023-07-21T18:33:09+5:302023-07-21T18:33:31+5:30
ही घटना घडताच बस प्रवाशांसह पोलिस ठाण्यात नेण्यात आली होती.

सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण
गेवराई : गेवराई-पुणे बसमध्ये प्रवाशाने बसचालकाच्या बाजूला सामान ठेवले. मात्र ते सामान काढून मागे टाका, असे सांगताच प्रवाशाने चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता गेवराई बसस्थानकात घडली.
गुरुवारी दुपारी गेवराई-पुणे बस (एमएच २० बीएल ३८५०) पुण्याकडे जाण्यासाठी बसस्थानकात उभी होती. यावेळी प्रवासी उदयराज भाऊसाहेब सिरसट (३०, रा. माऊलीनगर, गेवराई) यांनी बसचालकाच्या बाजूच्या असलेल्या केबिनमध्ये सामान ठेवले. बसचालक योगेश लव्हाळे (३६, रा. केकतपांगरी, ता. गेवराई) यांनी 'तुमचे सामान मागे टाका. मला समोरील आरसा दिसत नाही’ असे म्हणताच सिरसट यांनी बसचालकास गाडीतच लाथा, बुक्क्याने बेदम मारहाण केली.
यात चालकाला मुका मार लागला असून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मार जास्त असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना घडताच बस प्रवाशांसह पोलिस ठाण्यात नेण्यात आली होती. तसेच आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनीदेखील पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.