मटणाच्या वाटणीवरून वाद; मद्यपीने डोक्यात मारला गावठी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:35 IST2019-03-22T18:34:30+5:302019-03-22T18:35:02+5:30
मद्यपीने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

मटणाच्या वाटणीवरून वाद; मद्यपीने डोक्यात मारला गावठी कट्टा
कडा (बीड ) : धुलीवंदन निमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. परंतु, एका त्रयस्थ मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला. मटन दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडलेल्या मद्यपीने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील हातवण येथे घडली.
गुरुवारी धुलीवंदन असल्याने जिल्हाभरात सर्वत्र पार्ट्यांची धूम होती. हातवण येथील महेंद्र शंकर कोरडे आणि त्यांचे मित्र दस्तगीर चाँद सय्यद, गोरख निवृत्ती काळोखे आणि इतर मित्रांनी मटणासाठी बोकड आणले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दस्तगीर यांच्या घराशेजारी या मित्रांनी ते बोकड कापले. त्यानंतर मटणाचे हिस्से करत असताना तिथे जनार्धन बेरड (रा. तरडगव्हाण, जि. अहमदनगर) हा मद्यपी मटन घेण्यासाठी आला.
सध्या मटन वाटपाची यादी तयार झाली असून उरले तर तुला देऊ, असे सांगताच जनार्धनने आरडाओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरडे आणि त्यांच्या मित्रांनी जनार्धनला एक किलो मटन दिले आणि बदल्यात साडे चारशे रुपये मागितले. याचा राग आल्याने जनार्धनने स्वत:जवळील गावठी कट्टा काढला आणि कोरडे यांच्या डोक्यात मारला. यावेळी त्या कट्ट्यातून एक काडतूस देखील खाली पडली. कट्टा जोरात लागल्याने कोरडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर कोरडे यांच्या मित्रांनी मध्यस्थी करत जनार्धनला रोखले आणि मारहाण करत पिटाळून लावले. याप्रकरणी कोरडे यांच्या फिर्यादीवरून जनार्धनवर अंभोरा पोलिसात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.