फुटाफुटावर दवाखाने, नोंदणी केवळ ३८३ चीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:07+5:302021-01-08T05:48:07+5:30
बीड : जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात फुटाफुटावर खाजगी रूग्णालये उभारले आहेत. परंतु बीड ...

फुटाफुटावर दवाखाने, नोंदणी केवळ ३८३ चीच
बीड : जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात फुटाफुटावर खाजगी रूग्णालये उभारले आहेत. परंतु बीड एनआयसीच्या पोर्टलवर केवळ ३८३ रुग्णालयांचीची नोंदणी असल्याचे समोर आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता ग्रामीणमध्ये १२८ रुग्णालयांची नोंदणी आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सकांडे १५ दिवसांपासून माहिती मागितली असतानाही बुधवारपर्यंत ती प्राप्त झाली नव्हती. विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगूनही संबंधित लिपिकेने याकडे कानाडोळा केला. या परिस्थितीवरून जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार कशाप्रकारे चालतो, याची प्रचिती येते.
ग्रामीणमध्ये वर्षभरात तीन मुन्नाभाईंवर कारवाई ?
परवानगी न घेता व पदवी नसतानाही काही लोक वैद्यकीय व्यवसाय करतात. अशा तिघांवर २०२० मध्ये कारवाया करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या तीनही कारवाया एकट्या गेवराई तालुक्यात झाल्या असून संबंधितांवर गुन्हे नोंद झाले आहेत.
सीएसने सांगूनही माहिती देण्यास टाळाटाळ
शहरांतील खाजगी रूग्लयांची नोंदणी जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी सांगूनही १५ दिवस उलटले तरी संबंधित लिपिकेने माहिती दिली नाही. आज उद्या करून टाळाटाळ करण्यात आली.
बीड ग्रामीणमध्ये १२८ रुग्णालयाची नोंदणी
ग्रामीण भाग आमच्याकडे येतो. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात १४८ खाजगी रुग्णालांची नोंदणी आहे. त्यांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे सर्व नियम, अटी घालून परवानगी दिलेली आहे. तसेच बोगस काम करणाऱ्या तीन डॉक्टरांवर वर्षभरात कारवाई केली आहे. तक्रार आल्यास चौकशाही केल्या जातात.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड