प्रतिपूर्ती वेळेत मिळत नसल्याने इंग्रजी शाळांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:16+5:302021-02-05T08:29:16+5:30
बीड : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित ...

प्रतिपूर्ती वेळेत मिळत नसल्याने इंग्रजी शाळांच्या अडचणी वाढल्या
बीड : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्य शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यानुसार तीन शैक्षणिक वर्षांतील प्रतिपूर्ती ५० टक्के प्रमाणातच वाटप करण्यात आली आहे. शासनाकडून १३ कोटी २५ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाल्यास प्रतिपूर्ती शंभर टक्के वाटप होऊ शकेल.
आरटीई २५ टक्के राखीव कोट्यांतर्गत निकषपात्र इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश दिले जातात. प्रवेशित मुलांसाठी शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती शाळांना वितरित केली जाते. इंग्रजी शाळांतील शुल्कानुसार आरटीईअंतर्गत प्रती विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये मर्यादेत वार्षिक प्रतिपूर्ती दिली जाते.
या योजनेअंतर्गत निकषपात्र शाळांमधून हे प्रवेश दिले जातात. मात्र, प्रतिपूर्तीचा निधी मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक शाळांपुढे आर्थिक संकटही घोंघावत आहे.
मात्र, आता संच मान्यता असो किंवा शासनाच्या शैक्षणिक योजना असोत विद्यार्थ्यांची शंभर टक्के आधार नोंदणी झाल्याशिवाय कुठलीही कार्यवाही करू नये असे शासनाचे आदेश आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सर्व मुलांची आधार नोंदणी असेल तरच प्रतिपूर्ती मिळणार आहे.
----
२०१७-१८ मध्ये जिल्ह्यात १७३ शाळा निकषपात्र होत्या. या शाळांमध्ये १३७४ प्रवेश झाले होते. या वर्षाचा २ कोटी २३ लाख ५७ हजार रुपये निधी मिळाला.
---------
२०१८-१९ मध्ये आरटीई अंतर्गत २०० शाळा निकषपात्र होत्या. या शाळांमध्ये १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यावर्षी शासनाकडून ६७ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मिळाला.
---------
२०१९-२० मध्ये जिल्ह्यात १९८ शाळा निकषपात्र आहेत. २०३४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यावर्षी २ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळाला.
---------
२०१७-१८ मध्ये ५० टक्के, २०१८-१९ मध्ये ५० टक्के तर २०१९-२० मध्ये शंभर टक्के निधी वाटप झाला आहे.
-------
आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के असणाऱ्या शाळांना शुल्क प्रतिपूर्ती एकूण आधार नोंदणीच्या प्रमाणात नियमानुसार वितरित केले जाणार आहे. सर्व शाळा व्यवस्थापन व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करून घ्यावी.
-श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
-------
झालेले प्रवेश
२०१७-१८ : १३७४
२०१८-१९ : १९०२
२०१९-२० : २०३४
--------
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात निकषपात्र शाळा
२२९