धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:43 PM2022-06-16T16:43:00+5:302022-06-16T16:43:10+5:30

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार.

Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

googlenewsNext

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. 16) नवी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या विस्तारीकरण/अपग्रेडेशन, विविध पुलांची उभारणी आदी कामांना मंजुरी देण्याची मागणी केली असून, या सगळ्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द नितीन गडकरी यांनी दिला आहे.

परळी ते बीड मार्गावरील परळी ते सिरसाळा हा टप्पा मंजूर असून पुढील टप्प्यात सिरसाळा ते तेलगाव व तेलगाव ते बीड हे दोन्हीही रस्ते सिमेंट काँक्रेटचे करून चौपदरीकरण करण्यात यावे, तसेच अंबाजोगाई ते लातूर दरम्यान बीड जिल्हा हद्दीतील दुहेरी रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून, अंबासाखर कारखाना येथील उड्डाणपूल ते लातूर रस्त्यावरील बीड जिल्हा हद्द हा 14 किमी अंतराचा रस्ता देखील चौपदरी करण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

परळी शहर हे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग व थर्मल पावर स्टेशन मुळे अत्यंत गजबजलेले असून, मोठी वाहतूक असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पुलाचा चौपदरी विस्तार करण्यात यावा तसेच, छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोनपेठ फाटा या रस्त्याचे चौपदरीकरण व त्यावरील दुसऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचा देखील चौपदरी विस्तार करण्याचीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

परळी शहराच्या बायपास रस्त्याचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून, दुसऱ्या टप्प्यातील टोकवाडी ते संगम या 2.7 किमी लांबीच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी मुंडेंनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील चालु असलेल्या पुलांचे काम हे पूल-कम बंधारा या पद्धतीने केले तर लगतच्या गावांना त्याचा फायदा होऊन काही प्रमाणात का असेना पण जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी होऊ शकते, याबाबत धनंजय मुंडे यांनी अभ्यासपूर्ण व उदाहरणांसहित मांडणी केली. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी, इंजेगाव, कौठळी अशा काही राष्ट्रीय महामार्गांच्या लगत असलेल्या गावांची नावे देखील मुंडे यांनी सुचवली असून, तिथे चालू किंवा प्रस्तावित पुलाचे पूल-कम बंधाऱ्यात रूपांतर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

परळी तालुक्यातील पांगरी येथे एक सर्व सुविधा युक्त ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची देखील धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे. त्याचबरोबर सोलापूर धुळे महामार्गाच्या बीड शहर बायपासवर परळी रस्त्याच्या ठिकाणी जंक्शन सह सर्व्हिस रोडचे काम हाती घेण्यात यावे, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.  केंद्रीय मार्ग निधी योजनेतून अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई- गित्ता ते जवळगाव, बरदापुर-हातोला ते तळेगाव घाट आणि निरपणा ते उजनी या तीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली असून, वरील सर्व कामे सन 2022-23 च्या वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्यात यावीत, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी नितिन गडकरी यांना केली आहे. 

लोकार्पण व शुभारंभ 

दरम्यान परळी ते अंबाजोगाई या रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परळी शहर बायपासच्या पहिल्या टप्प्याचे कामदेखील वेगाने सुरू असून, परळी ते बीड रस्त्यातील परळी ते सिरसाळा हे काम येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. त्यादृष्टीने धनंजय मुंडे यांनी परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी ते सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ यासाठी नितीन गडकरी यांना परळी येथे येण्यासाठी निमंत्रित केले असून, हे निमंत्रण स्वीकारत नितिन गडकरी यांनी जुलै महिन्यात परळीला येण्याचे कबूल केले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी केलेल्या सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, संबंधित कामांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे व त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही विभागाला दिले आहेत.

Web Title: Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.