धनंजय मुंडे अपघातानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात, गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 15:47 IST2023-02-12T15:47:11+5:302023-02-12T15:47:20+5:30
गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता, तेव्हापासून ते मुंबईतच आराम करत होते.

धनंजय मुंडे अपघातानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात, गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे मागील महिन्यात अपघात झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी बीड जिल्ह्यात प्रथमच आले आहेत. यावेळी त्यांनी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे जाऊन वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
संत वामानभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मागील 20 वर्षांपासून अखंडितपणे धनंजय मुंडे हे पुण्यतिथी महापूजेस उपस्थित राहत आले आहेत. मात्र यावर्षी अपघातग्रस्त असल्याने प्रथमच या परंपरेत खंड पडला होता. आता बरे झाल्यानंतर ते बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, प्रथम त्यांनी संत वामनभाऊ यांचे दर्शन घेत विधिवत पूजन केले. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांनी गडाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे स्वागत करून आशीर्वाद दिले.
धनंजय मुंडे यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांचे गहिनीनाथ गडावर जोरदार स्वागत केले. स्वागतासाठी सुमारे 5 क्विंटल फुलांचा हार घालण्यात आला, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केले. यावेळी आष्टी-पाटोदा-शिरूर कासार चे आमदार बाळासाहेब आजबे काका, रामकृष्ण बांगर, सतीश शिंदे, विठ्ठल अप्पा सानप, आप्पासाहेब राख, गहिनीनाथ सिरसाट, बाळा बांगर, सतीश बडे, शिवाजीराव नाकाडे, निलेश आघाव, विश्वास नागरगोजे, शिवा शेकडो यांच्यासह धनंजय मुंडे यांचे असंख्य समर्थक यावेळी उपस्थित होते.