सायबर सेलचे मनुष्यबळ कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:36+5:302021-04-02T04:34:36+5:30
सायबर सेलकडे तक्रारींचे प्रमाण वाढले : बँक व सोशल मीडियाच्या तक्रारी अधिक बीड : सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा ...

सायबर सेलचे मनुष्यबळ कमी
सायबर सेलकडे तक्रारींचे प्रमाण वाढले : बँक व सोशल मीडियाच्या तक्रारी अधिक
बीड : सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शासनाकडून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान बीड सायबर सेलकडील मनुष्यबळ कमी असल्यामुळे २२ पैकी २० गुन्हे अद्याप तपासावर असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडिया साईटवरील फेसबूक, व्हॉट्सॲप तसेच फोन पे, गुगल पे, एटीएमच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सायबर सेलकडे प्राप्त होत आहेत. त्यामध्ये तक्रारदाराचे समाधान करून फसवणूक झालेल्या ग्राहकाला पैसे मिळवून देण्यासाठी सायबर सेलमधून मदत केली जाते. सोशल मीडियाचा गैरवापर केल्यानंतर त्यासंदर्भात समाधान न झाल्यास तक्रारदाद्वारे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. मागील काही महिन्यात बीड सायबर सेलचा कायापालट करण्यात आला असून, एटीएम क्लोनिंगद्वारे फसवणूक करणारी परराज्यातील टोळी जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
सायबर सेलमध्ये दोन अधिकारी व ६ कर्मचारी कार्यरत आहेत. गतवर्षात सर्वाधिक तक्रारी ऑनलाइन बँकिंग फसवणूक व सोशल मीडियाचा गैरवापर या प्रकारच्या आहे. दरम्यान बँक फसवणूक ५८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ५० जणांना समाधान करण्यात सायबर सेलला यश आले आहे. तर, ७ जणांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोशल मीडियासंदर्भात २६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान सायबर सेलच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आणले जात असून, गुन्ह्याचे प्रमाणदेखील वाढत आले. अनेक पोलीस ठाणे मात्र, अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवतात. त्यामुळे अशा तक्रारदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे येऊन सायबर सेलकडे तक्रार देण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
सायबर सेलकडे २२ गुन्हे तपासासाठी
विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले सायबर सेलच्या संबंधित २२ गुन्हे आहेत. त्यापैकी २ गुन्हे निकाली काढले असून, २० गुन्ह्याचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून सुरू आहे. सोशल मीडिया व बँक फसवणूक तक्रारी मात्र, मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आलेल्या आहेत.
ऑनलाइन गंडा घातल्याच्या सर्वाधिक तक्रारी
ऑनलाइन फोन पे किंवा गुगल पे च्या माध्यमातून कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. तर,फेसबुकवरून अश्लील टिपणी किंवा अकाउंट हॅक करण्याच्या तक्रारी सर्वांधिक असल्याचे दिसून येत आहे.
सायबर सेलची सद्य:स्थिती
एकूण मनुष्यबळ ८
अधिकारी २
कर्मचारी ६
२२ गुन्हे दाखल
२० गुन्हे तपासावर