मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 20:07 IST2023-01-28T13:44:58+5:302023-01-28T20:07:04+5:30
कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

मृत्यू जवळून पाहिला; वळणावर चालकाचा ताबा सुटला, लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली
- नितीन कांबळे
कडा (बीड): पुण्याहून कुटुंबासह नांदेडकडे नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असताना चालकाचा वळणावर अचानक ताबा सुटल्याने सुरक्षेसाठी लावलेली लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली. यात एकाच कुटुंबातील चारजण प्रवास करत होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सुर्यकांत आरडे ( ७० ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरीघाट परिसरात झाला.
नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने पुण्याहून आरडे कुटुंब नांदेडकडे कारमधून ( एम.एच २९,ए.आर. २५९६ ) निघाले होते. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरून ते दुपारी प्रवास करत होते. दरम्यान, आष्टी तालुक्यातील पिंपरीघाट येथील कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालक रोहन आरडेचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या सुरक्षा कठड्यावर आदळली. जोरदार धडकेने लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली. यात सुर्यकांत आरडे यांचा मृत्यू झाला. तर पत्नी अनिता आरडे, मुलगा रोहन सुर्यकांत आरडे, कोमल रोहन आरडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.