हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नवविवाहीतेचा शॉक लागुन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:19 IST2019-06-05T17:16:53+5:302019-06-05T17:19:06+5:30
कुलरची साफसफाई करताना घडली घटना

हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नवविवाहीतेचा शॉक लागुन मृत्यू
मादळमोही (बीड ) : घरातील साफसफाई करतेवेळी कुलरला हात लागला आणि शॉक लागून नवविहितेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे बुधवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे हाताची मेंदी निघण्यापूर्वीच ही घटना घडली आहे. शुभ विवाहानंतर अवघ्या बारा दिवसांनी ‘अशुभ’ घटना घडल्याने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोमल संजय शेलार (वय १९ रा.मादळमोही ता.गेवरार्ई) असे मयत नवविवाहितेचे नाव आहे. कोमलचे माहेर जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी हे आहे. २४ मे रोजी मादळमोही येथील संजय शेलार याच्याशी अगदी साध्या पध्दतीने तिचा विवाह झाला होता. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर कोमल ही घरातील साफसफाई, सारवण करत होती. याचवेळी कुलरची देखील ओल्या कापडाने सफाई करत होती. मात्र कुलरमध्ये अगोदरच विद्यूत प्रवाह असल्याने तिला जोराचा शॉक बसला आणि ती जागीच गतप्राण झाली. हा प्रकार पाहिल्यानंतर कोमलच्या सासरच्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. हा प्रकार तत्काळ गेवराई पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह मादळमोही येथील आरोग्य केंद्रात दाखल केला.