परळी : येथील थर्मलमधून निघणाऱ्या राखेचा व्यापारामुळे सध्या परळीचे नाव चर्चेत आहे. परळीमध्ये ज्या ठिकाणी ही राख जमा होते त्या दाऊतपूर येथील ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेत विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. राख बंधाऱ्यामुळे दाऊतपूरचे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत तसेच प्रदूषणाचा अख्या गावाला सामना करावा लागतो. त्यामुळे आधी राखेचे प्रदूषण थांबवा असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
दाऊतपुर राख बंधाऱ्यामुळे दाऊतपूर व दादाहारी वडगाव हे दोन गावे बाधित आहेत. या दोन्ही गावच्या लोकांना राखेच्या प्रदूषणाचा गेल्या अनेक वर्षापासून भयानक त्रास सहन करावा लागत आहे. या दोन गावासाठी केंद्र सरकारच्या गाईड लाईननुसार राख साठा उचलण्यास थर्मलची परवानगी आहे. बाधित दाऊतपुर गावातील 200 लोकांचा रोजगार राख व्यवसायावर अवलंबून आहे. त्यानुसार राखेचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी दाऊतपूरच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. परळी थर्मल च्या राख बंधाऱ्यातून होणारी राख उपसा एक महिन्यापासून बंद करण्यात आला आहे . त्यामुळे अनेकांच्या हाताला मिळणारा रोजगार बंद झाला असून. भविष्यात राखेवर अवलंबून असलेला विट उद्योगही धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे वीट भट्टी वरील कामगार वर्गावरही उपासमारीची वेळ येऊ शकते असे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले.
काय आहेत ग्रामस्थांच्या मागण्या
बाधित दाऊतपुर गावच्या विकासासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात यावा, प्रदूषित बाधित बेरोजगार, सुशिक्षित युवकांना निर्वाह भत्ता 16 हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा. दाऊतपुर येथील बॉटम राख ( पौंड अॅश ) अन्यायकारक निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी व दाऊतपूर येथील प्रदूषित बाधित स्थानिक नागरिकांना शंभर टक्के राख कोठा ठरवून 75 रुपये प्रति टन प्रमाणे राख उचलण्याची परवानगी मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी दाऊतपूर येथील ग्रामस्थांनी 4 फेब्रुवारीपासून नवीन थर्मलच्या गेट समोर उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील चालूच होते. या उपोषणामध्ये दाऊतपुर राख नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष सुग्रीव बिडगर, अंगद बिडगर, गौतम भंडारे, राहुल भालेराव, बेबीनंदा बिडगर यांच्यासह एकूण 35 महिला पुरुषांचा सहभाग आहे.