मृत महिला डॉक्टरचे बोट वापरून मोबाईलमधील डाटा केला डिलीट; कुटुंबीयांना संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:43 IST2025-10-28T19:37:05+5:302025-10-28T19:43:33+5:30
बीड कोर्टात खटला चालवण्याची कुटुंबीयांनी केली मागणी

मृत महिला डॉक्टरचे बोट वापरून मोबाईलमधील डाटा केला डिलीट; कुटुंबीयांना संशय
वडवणी (जि. बीड) : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी आता नवा आणि गंभीर दावा केला आहे. डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच, कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केला आहे की, मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा, तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले.
डॉक्टरच्या व्हॉट्स ॲपचा 'लास्ट सीन' हा त्यांच्या मृत्यू झाल्यानंतरचा दाखवत असल्यामुळे, गळफास घेतल्यानंतर कोणीतरी व्हॉट्स ॲप चालू केले असावे, असा तीव्र संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे डॉक्टरचे बोट वापरून मोबाईलचा लॉक उघडून पुरावे नष्ट केल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. हे संपूर्ण प्रकरण न्याय आणि सोयीच्या दृष्टीने बीडच्या कोर्टात चालवण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.
शासनाच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांची भेट
या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी शासनाच्या वतीने डॉ. ओमप्रकाश शेटे सोमवारी (सायंकाळी ५ वाजता) डॉक्टरांच्या गावी पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, पीडित कुटुंबाने मागण्यांचे निवेदन शेट्टे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे.
अनेक राजकीय नेत्यांकडून सांत्वन
खासदार रजनी पाटील, रमेश आडसकर, नवनाथ वाघमारे, काँग्रेसचे रवींद्र दळवी, सुशीला मोराळे, पप्पू कागदे, ओमप्रकाश शेटे, दत्ता बारगजे, रुक्मिणी नागापुरे, बाबूराव पोटभरे, अण्णासाहेब जाधव यांच्यासह अनेक सामाजिक आणि राजकीय लोकांनी कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार यांचा फोन
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या सोबतच राहू, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी कुटुंबीयांना दिला आहे.