देशसेवेसाठी जाताना सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:48 IST2020-08-26T16:46:26+5:302020-08-26T16:48:05+5:30
अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

देशसेवेसाठी जाताना सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू
गेवराई :- तालुक्यातील तांदळा येथील रहिवासी सीआरपीएफ जवान बिभीषण सीताराम सिरसट सुटीनंतर देशसेवेसाठी रुजू होण्यासाठी जाताना मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. यामुळे तांदळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील तांदळा गावचे भूमिपुत्र बिभीषण सीताराम सिरसट हे २००० साली सीआरपीएफ मध्ये रुजू झाले होते. देशाच्या विविध भागात त्यांनी तब्बल 20 वर्ष कर्तव्य बजावले. मार्च महिन्यात ते रजेवर गावी आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे गावाकडेच अडकून पडले होते. गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांना कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश आले होते. तत्पूर्वी नातेवाईकांना भेटून गावाकडे जात असतानाच मंगळवारी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय महामार्ग ६२ वरील साठेवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनामुळे तांदळा गावावर शोककळा पसरली असून तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.