पिकांची नासाडी करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत शेतकऱ्याचे फायटरने दात पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:32 IST2020-12-12T17:30:03+5:302020-12-12T17:32:17+5:30
Crime News In Beed दोघांवर ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पिकांची नासाडी करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत शेतकऱ्याचे फायटरने दात पाडले
अंबाजोगाई : शेतातील तुरीचे नुकसान करण्यापासून रोखणाऱ्या शेतकऱ्याला दोघा जणांनी जातीवाचक शिवीगाळ बेदम मारहाण करून जबर जखमी केले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे गुरुवारी सायंकाळी घडली. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांवर ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कचरु वामन जोगदंड वामन जोगदंड यांची बर्दापूर शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेजारी गणेश साधू जोगदंड यांची शेती आहे. त्या शेतातील एक प्लॉट वाहेद सय्यद यांना विक्री केला आहे. गुरुवारी (दि.१०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्या वाहेद सय्यद आणि मोहसीन मुसा उर्फ लखन शेख हे दोघे त्या प्लॉटवर आले आणि मुरुमाचा ढिगारा पांगवू लागले. त्यामुळे शेतातील तुरीचे नुकसान होत असल्याने कचरू जोगदंड यांनी त्या दोघांना पिकाचे नुकसान करू नका अशी विनंती केली.
त्यावर त्या दोघांनी कचरू यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुला जमीन काय करायची असे दटावले आणि फायटरने वार करून त्यांचे दोन दात पाडले. त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली अशी फिर्याद कचरू जोगदंड यांनी दिली आहे. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर बर्दापूर पोलीस ठाण्यात ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये करत आहेत.