खोक्याने दात पाडलेल्या ढाकणे कुटूंबावर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:11 IST2025-03-11T12:11:18+5:302025-03-11T12:11:27+5:30
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप

खोक्याने दात पाडलेल्या ढाकणे कुटूंबावर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा
बीड : तालुक्यातील बावी येथे डुकरं पकडण्याचा फास लावण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात बावी येथील ढाकणे कुटुंबातील चौघांविरोधात शिरूरकासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच ढाकणे यांनी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्याविरोधात दात पाडण्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली होती.
४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदीप मिठू ढाकणे आणि राम उत्तम ढाकणे हे घरी आले. तुमचा डुकरं पकडण्याचा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही आमच्या शेतात असलेले रानडुक्कर हुसकून द्या किंवा त्यांना पकडा. त्यावर पीडितेने माझ्याकडून हे काम होणार नाही तसेच माझे पतीदेखील दिव्यांग असल्यामुळे तेदेखील करत नाहीत. तेव्हा आरोपींनी तुमच्याकडे डुकरं पकडण्याचा फास आहे. तुम्ही तुमच्या मुलीला व मुलाला आमच्या शेतात फास लावण्यासाठी पाठवा, असे सांगितले. त्यावर पीडितेने माझ्या मुलीला आणि मुलाला दिलीप ढाकणे यांच्या शेतात फास लावण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जाण्याचे सांगितले.
त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ते गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता माझी मुलगी आणि मुलगा शेतात लावलेला फास पाहण्यासाठी गेले असता वरील आरोपींनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मुलीच्या अंगावर धावून गेले. सदरील प्रकार पाहून माझी मुलगी आरडाओरड करत पळत सुटली असता तिला पकडून विनयभंग केला. तसेच तिच्या ओटीपोटात लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मुलगा सोडविण्यासाठी मध्ये गेला असता त्याच्या डोक्यात तलवारीने जबर मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावरून विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
खोक्याने दात पाडले, पाय मोडला
खोक्या भोसले याने दिलीप ढाकणे यांचे कुऱ्हाडीने मारून समोरील १० दात पाडले होते. तर त्यांचा मुलगा महेश ढाकणे याच्या पायावर सत्तूरने वार करून तो तोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खोक्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ढाकणे कुटूंबातील गुन्हा नोंद झाला आहे.