वाळूमाफियांचे धाडस वाढले; ताब्यातील टिप्पर पळवून नेऊन महसूल पथकावर घातली गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 15:21 IST2021-04-10T15:18:32+5:302021-04-10T15:21:01+5:30
एका जीपमधून (एमएच 23 एडी-5990) वाळूमाफिया आले आणि त्यांनी जबरदस्तीने टिप्पर पळवून नेले.

वाळूमाफियांचे धाडस वाढले; ताब्यातील टिप्पर पळवून नेऊन महसूल पथकावर घातली गाडी
गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना शुक्रवार रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार सचिन खाडे व इतर कर्मचारी पाडळसिंगी टोलनाका येथे वाळू वाहतुकीचा परवाना चेक करत होते. त्यानंतर काही कामानिमित्त तहसीलदार गेवराईला गेले व पावत्या चेक करणे सुरू ठेवा असे येथे उपस्थित असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना सांगितले. यावेळी तिथे वाळूने भरलेला एक टिप्पर (एमएच 23 डब्लू -4299) आला. त्यास अडवून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी चालकाकडे पावतीची चौकशी केली. चालकाने तारीख संपलेली पावती दाखवली. त्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी टिप्परवर कारवाई करत होते.
दरम्यान, तिथे एका जीपमधून (एमएच 23 एडी-5990) वाळूमाफिया आले आणि त्यांनी जबरदस्तीने टिप्पर पळवून नेले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी गाडीतून टिप्परचा पाठलाग केला. यावेळी शेख जुनैद चाँद व चालकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गाडीला धडक दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.