११ वर्षांच्या कन्येची हिंमत! अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःच केली सुटका; केजमधील चौथी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:57 IST2025-11-06T19:56:47+5:302025-11-06T19:57:18+5:30
केजमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा सिलसिला! आठवड्यात चौथी घटना, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

११ वर्षांच्या कन्येची हिंमत! अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःच केली सुटका; केजमधील चौथी घटना
- मधुकर सिरसट
केज (बीड): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी आता कहर केला आहे. जीवाचीवाडी येथे वडिलांना जेवण देऊन घरी परतणाऱ्या एका ११ वर्षीय निष्पाप मुलीचे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत खळबळजनक घटना बुधवारी (दि. ५) सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने, या मुलीने दाखवलेल्या हिंमतीमुळे अपहरणकर्त्याला तिला रस्त्यातच सोडून पळून जावे लागले आणि मोठा अनर्थ टळला.
जीवाचीवाडी येथील ११ वर्षीय मुलगी शेतात वडिलांना जेवण देऊन पायी घराकडे परत येत होती. रस्त्यात तिला एकटी पाहून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने तिला अडवले. "तुझ्या वडिलांकडे माझे पैसे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे," असे खोटे सांगून मुलीला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला वडिलांच्या शेतात घेऊन जाण्याचे कबूल केले. याच संधीचा फायदा घेऊन त्या विकृत व्यक्तीने मुलीच्या नाकासमोर पावडरचा वास देऊन तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केले.
आरडाओरडा केल्याने बचावली
जीवाचीवाडी येथून आरोपी तिला केजच्या दिशेने घेऊन निघाला. सुमारे २५ किमी प्रवासानंतर, केजजवळ असलेल्या कानडी रोड लगतच्या वीटभट्टीजवळ आल्यावर या हिंमतवान मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलगी ओरडत असल्याचे पाहताच, घाबरलेल्या अपहरणकर्त्याने तिला रस्त्यातच सोडून दुचाकीवरून पोबारा केला. स्वसंरक्षणामुळे सुटलेली मुलगी पायी चालत केज बस स्थानकावर पोहोचली. तिथे तिची भेट एका नातेवाईक महिलेशी झाली. त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आरोपी लव्हूरी आणि कानडीमाळी मार्गे केजला आल्यामुळे येवता चौक, लव्हूरी आणि कानडीमाळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा दुचाकी नंबर व तो कैद झाला आहे. त्या आधारे आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल.
तालुक्यात आठवड्यातील चौथी घटना!
केज तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील ही चौथी घटना असल्यामुळे पालक वर्गात मोठी चिंता आणि खळबळ पसरली आहे.