CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 16:00 IST2020-04-28T15:59:45+5:302020-04-28T16:00:46+5:30
कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायदा कलमा नुसार नोटीस

CoronaVirus : पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश; जयगाव, कौडगावच्या सरपंचांना नोटीस
बीड : कोरोना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रतिबंध न करता प्रवेश दिल्याप्रकरणी परळी तालुक्यातील जयगाव येथील सरपंच इंदुबाई नायबळ व कौडगाव हुडा (गव्हाणे) येथील सरपंच सुभाष राठोड यांना सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावून गुन्हा का दाखल करु नये अशी विचारणा केली आहे.
कोरोना नियंत्रण कक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या पत्राचा संदर्भ देत ही नोटीस बजावण्यात आली. कोरोना विषाणू अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन गावात बोहरगावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच गावातील मुळ रहिवासी असलेला व बाहेरुन गावात आलेल्या व्यक्तीची राहण्याची सोय लोकवस्तीपासून दूर शेतात किंवा इतर ठिकाणी करावी, असे सक्त आदेश असताना जयगाव येथे पुण्याहून आलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात आला. त्याला गावात राहण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केलेला नाही. सदर व्यक्तीला आजाराची लक्षणे आढळून आल्याने सध्या उपचारकामी दावाखान्यात दाखल केलेले आहे. एक जबाबदार लोकसेवक असताना व जिल्हाधिकाºयांचे आदेश असताना सदर व्यक्तीला गावात प्रवेश दिला, कोणताही प्रतिबंध केला नाही. सदर व्यक्ती गावात राहात असल्याबद्दल पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये अशी विचारणा करुन तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दोन्ही सरपंचांना दिले आहेत.