CoronaVirus : बीडसाठी ३० व्हेंटिलेटरची मंजुरी, कोव्हीड रुग्णालयांमध्ये होणार वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:50 IST2020-05-04T11:48:55+5:302020-05-04T11:50:02+5:30
कोरोनामुळे रुग्ण गंभीर झाल्यास त्याला कृत्रीम श्वासोच्छवास लागू शकतो. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने शासनाकडे व्हेंटिलेटरची मागणी केली होती

CoronaVirus : बीडसाठी ३० व्हेंटिलेटरची मंजुरी, कोव्हीड रुग्णालयांमध्ये होणार वापर
बीड : कोरोना आजाराचे रुग्ण आढळले तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
कोरोनामुळे रुग्ण गंभीर झाल्यास त्याला कृत्रीम श्वासोच्छवास लागू शकतो. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने शासनाकडे व्हेंटिलेटरची मागणी केली होती. ३० व्हेंटिलेटवर मंजूरही झाले असून आठवडराभरात ते दाखल होणार आहेत. याचा वापर कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उभारलेल्या कोव्हीड रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे.
राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मराठवाड्यातही बीड वगळता सर्वत्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. बीडचा शुन्य अद्यापही कायम आहे. जर दुर्दैवाने पुढे कोरोनाचे रुग्ण वाढले तर आरोग्य विभागाने अगोदराच उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई, केज, परळी आणि लोखंडी सावरगाव येथे ७५० खाटांचे कोव्हीड रुग्णालये तयार केले आहेत. येथे प्रत्येक १०० खाटांच्या मागे ८८ लोकांची नियुक्तीही केली आहे. परंतु अचानक जर कोणाची प्रकृती खालावली तर कृत्रीम श्वासोच्छवास देण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने अगोदरच शासनाकडे याची मागणी केली होती. त्याप्रमाणे ३० व्हेंटिलेटरला मंजुरी मिळाली आहे. आठवडाभरात ते मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या बीडमध्ये १०, अंबाजोगाई १०, केज व परळीमध्ये प्रत्येकी १ आणि खाजगी ५७ असे ७९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. दोन दिवसांपूर्वी गेवराईत माजी मंत्री आमरसिंह पंडीत यांनी ३ व्हेंटिलेटर दिल्याने ही संख्या ८२ वर पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. घरातच थांबून सुरक्षित रहावे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
बीडचे कोव्हीड रुग्णालय झाले सज्ज
बीडमध्ये २५० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालय तयार केले आहे. प्रत्येक खाटासाठी स्वतंत्र व अद्ययावत कक्ष तयार केला आहे. सर्वत्र आॅक्सीजनची व्यवस्था केली आहे. याचा आढावा रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी घेतला. काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.ए.आर.हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.जयश्री बांगर, मेट्रन संगिता दिंडकर, जितेंद्र देशपांडे, मुकादम नान हजारे आदींची उपस्थिती होती.
शहरात सध्या ८२ बेड उपलब्ध
३० व्हेंटिलेटरची मागणी शासनाकडे केली होती. याला मंजुरी मिळाली आहे. आठवडाभरात ते मिळतील. जर पुढे गरज भासली तर आणखी मागणी करण्यात येईल. शासकीय, खाजगी असे ८२ व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध आहेत. बीडचे कोव्हीड रुग्णालय पूर्णपणे तयार झाले आहे. वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले आहेत.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड