corona virus : खोडसाळपणे मित्राला कोरोना झाल्याचे स्टेट्स अपडेट केले; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:44 IST2020-03-16T16:35:04+5:302020-03-16T16:44:00+5:30
या पोस्टमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

corona virus : खोडसाळपणे मित्राला कोरोना झाल्याचे स्टेट्स अपडेट केले; दोघांवर गुन्हा दाखल
आष्टी (जि. बीड) : मित्राच्या फोटोसह ‘कोरोनो या व्हायरसचा रुग्ण आष्टीत आढळला’ अशी अफवा पसरविणाऱ्या दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषिकेश वीर व प्रथमेश आवारे अशी दोघांची नावे आहेत. या पोस्टमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
आष्टी पोलीस ठाण्यात पीडित मुलाने शनिवारी दिलेल्या तक्रारीनुसार ३ वाजता घरी झोपलो असताना त्याचा मित्र ऋषिकेश वीर याने आॅनलाईन येऊन व्हॉटस्अॅप स्टेटस बघ असे सांगितले. पीडित मुलाने मोबाईलवर स्टेटस पाहिले असता,आष्टीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला म्हणून त्याचे नाव व फोटो पहिल्या क्रमांकाच्या स्टेटसमध्ये दिसला. दोन नंबर स्टेटस मध्ये एका टीव्ही चॅनेलची ब्रेकिंग न्यूज म्हणून त्याचे नाव दाखविण्यात आले होते. अशा तीन स्टेटसमध्ये त्याला कोरोनाचा रुग्ण दाखविण्यात आले होते. यामुळे पीडित मुलाला मानसिक धक्का बसला. त्याने ऋषिकेश वीरला स्टेटस डिलेट करण्यास सांगितले; परंतू तोपर्यंत अनेक जणांनी स्टेटसचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. ओळखीच्या अनेकांनी पीडित मुलाच्या कुटुंबियांना फोन करून चौकशी केली. यामुळे कुटुंबियांनाही धक्का बसला.
पीडित मुलाने पोलिसांत घेतली धाव
हे स्टेटस ऋषिकेश व प्रथमेश यांनी तयार करून मोबाईलवर व्हायरल केले. यामुळे पीडित मुलाविषयी नागरिकांमध्ये भय निर्माण झाले. यामुळे त्याने अफवा पसविणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक एम.बी.सूर्यवंशी यांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफवा पसरविणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंदवला. तपास पोउनि. अमितकुमार करपे करीत आहेत.