नारायण गडाचा उत्तराधिकारी ठरविण्यावरून वाद? महंत शिवाजी महाराजांच्या भाच्याला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:01 IST2025-06-27T12:00:40+5:302025-06-27T12:01:24+5:30

दुसरे कोणतेही महंत नियुक्त करा, पण घराणेशाहीचा पायंडा नको, असा नारा ग्रामस्थ, भक्तांनी दिला आहे

Controversy over the appointment of Narayan Gad's successor? Opposition to Mahant Shivaji Maharaj's nephew | नारायण गडाचा उत्तराधिकारी ठरविण्यावरून वाद? महंत शिवाजी महाराजांच्या भाच्याला विरोध

नारायण गडाचा उत्तराधिकारी ठरविण्यावरून वाद? महंत शिवाजी महाराजांच्या भाच्याला विरोध

बीड : धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेला श्रीक्षेत्र नारायण गड सध्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून वादात सापडला आहे. महंत शिवाजी महाराज यांनी आपलेच भाचे संभाजी महाराज यांची नियुक्ती केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी त्याला विरोध करत 'घराणेशाही नको'चा नारा दिला आहे.

श्री क्षेत्र नारायण गड येथे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धाकटी पंढरी म्हणून ओळख असल्याने येथे नेहमीच भक्तांची गर्दी असते. भव्यदिव्य आणि आकर्षक मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून येथे अनेक विकासकामेही करण्यात आली आहेत. परंतु ११ मार्च २०२५ रोजी नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महंत शिवाजी महाराज यांनी गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून आपलेच भाचे महंत गुरुवर्य संभाजी महाराज यांची नियुक्ती केली. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागतही झाले होते. परंतु आता या निवडीला विरोध होऊ लागला आहे. यासाठी २२ व २४ जून रोजी गडावर बैठकाही झाल्या आहेत. यात पंचक्रोशीतील अनेक गावचे भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थ, भक्तांचे म्हणणे काय?
श्री क्षेत्र नारायण गडाच्या परिसरातील ग्रामस्थ व भक्त हे सकाळ, संध्याकाळ ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता येथे सेवा करतात. काेणताही कार्यक्रम असला तर पुढेही होऊन नियोजन करतात. परंतु या निवडीच्या वेळी त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आहे. तसेच गडावर घराणेशाही नको, असे म्हणत त्यांनी महंत शिवाजी बाबा यांनी नियुक्त केलेल्या त्यांच्याच बहिणीचा मुलगा गुरुवर्य संभाजी महाराज यांच्या निवडीला विरोध केला. दुसरे कोणतेही महंत नियुक्त करा, पण घराणेशाहीचा पायंडा नको, असा नारा त्यांनी दिला आहे.

२२ व २४ जून रोजी बैठका
२२ जून रोजी रात्रीच्या वेळी या निवडीचा वाद चार भिंतीत मिटविण्याचे ठरले. परंतु त्या दिवशी काहीच झाले नाही. काही लोकांनी विश्वस्तांवरच आक्षेप घेतला. त्यामुळे एका विश्वस्ताने बैठकीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर महंत शिवाजी बाबा यांनी २४ जून रोजी सकाळी बैठक बोलावली. परंतु त्या दिवशी ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे लोक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी गडाच्या ठिकाणीच बैठक घेत अनेक गंभीर आरोप करत संभाजी महाराज यांच्या निवडीला विरोध केला.

पैसे घेतल्याचा विश्वस्तांवर आरोप
संभाजी महाराज यांची नियुक्ती करताना काही विश्वस्तांनी पैसे घेतल्याचा आरोप बैठकीत लोकांनी केला आहे. तसेच विश्वस्त हे माळकरी, टाळकरी असावेत असा सूर उमटला. सध्याच्या विश्वस्तांपैकी अनेकजण हे राजकीय पदाधिकारी आहेत. परंतु काही लोकांनी राजकीय असल्याने विकासासाठी निधी जास्त आणत असल्याचा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गडावर दसरा मेळावा
नारायण गडावर यावेळी दसरा मेळावा घेतला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येथे प्रमुख उपस्थिती होती. राज्यातून लाखो मराठा बांधव आणि भक्त येथे आले होते.

आतापर्यंत गादीचा मान कोणाला?
नारायण महाराज, दादासाहेब महाराज, महादेव महाराज, गोविंद महाराज, नरसू महाराज, महादेव महाराज, माणिक महाराज, महादेव महाराज, शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराज हे दहावे उत्तराधिकारी आहेत.

विश्वस्त कोण आहेत?
बळीराम गवते, राजेंद्र जगताप, अनिल जगताप, दिलीप गोरे, भानुदास जाधव, जनार्धन शेळके, महादेव तुपे, गोवर्धन काशीद, राजेंद्र मस्के, संभाजी ढोबळे, महंत शिवाजी महाराज असे विश्वस्त आहेत.

Web Title: Controversy over the appointment of Narayan Gad's successor? Opposition to Mahant Shivaji Maharaj's nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.