बीडच्या सांगवीचा 'कंटेनर पॅटर्न'; ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे ४६५ कंटेनरची मालकी, सामूहिक लक्ष्मीपूजन चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 20:45 IST2025-10-21T20:42:50+5:302025-10-21T20:45:04+5:30
महाराष्ट्रातील 'कंटेनरचे गाव': सांगवीने पुसला ऊसतोड मजुरांचा कलंक; दिवाळीत १६० कंटेनरचे सामूहिक लक्ष्मीपूजन.

बीडच्या सांगवीचा 'कंटेनर पॅटर्न'; ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे ४६५ कंटेनरची मालकी, सामूहिक लक्ष्मीपूजन चर्चेत!
- मधुकर सिरसट
केज (जि. बीड): एकेकाळी केवळ ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सांगवी (सारणी) येथील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांनी हा कलंक पुसण्याचा विडा उचलला आहे. मालवाहतूक (कंटेनर) व्यवसायात उतरून त्यांनी गावासाठी एक नवी आणि प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे. आजमितीस या गावातील तरुणांकडे तब्बल ४६५ कंटेनरची मालकी असून, दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर येथे १६० कंटेनरचे सामूहिक लक्ष्मीपूजन करण्यात आले.
सामूहिक लक्ष्मीपूजन: एकतेचा संदेश
सांगवी गावात एकूण ४६५ कंटेनरची मालकी असून, त्यापैकी १६० कंटेनर दिवाळीनिमित्त गावात उपलब्ध होते. जागेच्या उपलब्धतेअभावी सांगवी येथील 'माणुसमारी शेत', अशोक केदार यांचे शेत आणि पिंपळगाव फाटा येथील खुल्या जागेत अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून या कंटेनरचे सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात आले. हभप अर्जुन महाराज लाड यांच्या हस्ते हे पूजन पार पडले. यावेळी सरपंच संजय केदार, जेष्ठ नेते दत्ता धस, उपसरपंच राम बिक्कड, रमाकांत धस यांच्यासह शेतकरी आणि कंटेनर मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत प्रत्येक कंटेनरचे पूजन करण्यासाठी मालक ताटकळत बसले होते.
४६५ कंटेनर! कोट्यवधींची उलाढाल
अवघ्या दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या छोट्या खेड्यात बेरोजगार युवकांनी मालवाहतूक ट्रकच्या माध्यमातून उद्योगाचा एक यशस्वी पर्याय निवडला. आज या गावात तब्बल २५ ट्रान्सपोर्टची कार्यालये कार्यरत आहेत. सांगवीतील तरुण या कंटेनरद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात मालवाहतुकीचे काम करतात. ४६५ कंटेनरच्या माध्यमातून महिन्याला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून या तरुणांनी केवळ स्वतःचा विकासच नाही, तर गावालाही समृद्धीच्या वाटेवर आणले आहे.
२०१५ पासून कंटेनर युगाची सुरुवात
सांगवी गावात कंटेनर व्यवसायाची सुरुवात २०१५ मध्ये झाली. शेतकरी रामेश्वर केदार हे गावातील पहिले कंटेनर मालक ठरले. यानंतर गावात कंटेनर खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. सरपंच संजय केदार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, "एकेकाळी ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या सांगवीतील ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे आज ४६५ कंटेनरची मालकी आहे. त्यामुळे सांगवीची ओळख आता 'कंटेनरचे गाव' अशी झाली आहे."
निरक्षर बाबुराव केदार: यशाचे प्रेरणास्रोत
सांगवीच्या यशातील एक अत्यंत प्रेरणादायी चेहरा म्हणजे निरक्षर बाबुराव केदार. दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेल्या बाबुराव यांनी सुरुवातीला दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. कष्टातून त्यांनी स्वतःची एक गाडी घेतली आणि आज त्यांच्याकडे तब्बल २५ कंटेनरची मालकी आहे. दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवताना त्यांच्या डोळ्यात परिस्थिती बदलल्याचा आनंद दिसत होता, तसेच भूतकाळातील बिकट परिस्थिती आठवून त्यांना अश्रूही अनावर झाले.
संघर्षातून प्रगती
१९९५-२०००: गावातील काही तरुण विविध वाहनांवर क्लीनर म्हणून काम करत होते.
२००१: गावातील १५ तरुण चालक बनले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामाला सुरुवात केली.
सध्या: याच कष्टाच्या बळावर आज हे तरुण स्वतःच्या कंटेनरचे मालक बनले असून, त्यांनी दाखवलेल्या एकत्रित संघशक्तीचा आदर्श वाखाणण्याजोगा आहे.