ग्राहकांना वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक; काय आहे सुरक्षा ठेव? परत मिळते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:08 IST2025-04-30T20:08:34+5:302025-04-30T20:08:56+5:30
एप्रिल व मे महिन्यांच्या बिलासोबत स्वतंत्र बिल, दोन्ही भरावे लागणार

ग्राहकांना वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक; काय आहे सुरक्षा ठेव? परत मिळते का?
बीड : जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, शिक्षण व आरोग्यावरील खर्च आदींमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले आहे. अशातच महावितरणकडून नियमित वीजबिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव, अशी दोन बिले मिळाल्याने ती भरणे गरजेचे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. तर यामुळे ग्राहकांना बिलाचा शॉक बसला आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहिता २०२१च्या विनियम १३.१ नुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची दरवर्षी पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर मागील एका वर्षातील ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीनुसार विनियम १३.१ नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार वीजबिलामध्ये व्याज समायोजित करून ग्राहकांना परत केली जाते.
काय असेल सुरक्षा ठेव?
पुढील आर्थिक वर्षात जर या ग्राहकाचा वार्षिक वीज वापर ७ हजार २०० रुपये झाला, तर सूत्रानुसार आणि सरासरीप्रमाणे सुरक्षा ठेवीची रक्कम १२०० रुपये होईल. या परिस्थितीत, ग्राहकाचे पूर्वी जमा असलेले १ हजार रुपये वजा करून त्याला फक्त २०० रुपये अतिरिक्त भरावे लागतील. या अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेच्या भरण्यासाठी ग्राहकाला नियमित वीजबिलाव्यतिरिक्त स्वतंत्र बिल दिले जाते.
...तर व्याजासह मिळेल रक्कम परत
महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून, वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करतेवेळी ती व्याजासह परत केली जाते. ग्राहकांकडून घेण्यात येणारी सुरक्षा ठेव ही प्रत्यक्षात त्यांच्याच हितासाठी वापरली जाते. ग्राहकांना मिळणारे वीजबिल हे त्यांनी मागील महिन्यात वापरलेल्या विजेचे देयक असते. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक वर्षातील दोन महिन्यांच्या सरासरी वीजबिलाइतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून महावितरण कंपनीकडे जमा करावी लागते.
घरी बसून भरता येणार सुरक्षा ठेव
लघुदाब वीज ग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरबसल्या भरण्याची सोय महावितरणच्या वेबसाइटवर आणि महावितरणच्या मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहनदेखील महावितरणने केले आहे.