संतोष देशमुख प्रकरण: तिरंगा हॉटेलवरचा ‘घास’; वाल्मीकच्या गळ्याला ‘फास’, तिथेच शिजला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:25 IST2025-03-08T08:24:14+5:302025-03-08T08:25:43+5:30
‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’, असा सल्ला एकाने संतोष देशमुखांना दिला होता. तर दुसरीकडे, विष्णू चाटे म्हणाला की, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’

संतोष देशमुख प्रकरण: तिरंगा हॉटेलवरचा ‘घास’; वाल्मीकच्या गळ्याला ‘फास’, तिथेच शिजला कट
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एकजण केज तालुक्यातील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला.
चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक ‘शब्द’ आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी तर झालाच पण या कटाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले. या प्रकरणात ५ गोपनीय साक्षीदारांचा समावेश आहे.
६ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग येथील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात सुदर्शन घुले दिसत होता. ८ डिसेंबर २०२४ रोजी घुले आणि अन्य एकजण टाकळी येथे भेटले. यावेळी घुले याने विष्णू चाटे याचा फोन आला असून तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावल्याचे सांगितले. चाटे हा अगोदरच तेथे होता. चाटे याने सुदर्शन घुले याला चांगलेच झापले होते.
देशमुखांनाही सल्ला
मारहाणीचा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने सरपंच देशमुख यांना, ‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’ असा सल्ला दिला. यापूर्वी मलाही कराडने धमकी दिली होती. मी विरोध केल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवले, असे जबाबात त्याने सांगितले आहे.
असा झाला होता संवाद
‘आम्ही कमवायचे, तुम्ही वाटोळे करायचे, स्वत:ची व आमची पण इज्जत घालवलीस. तुला प्लँट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलास’ असे चाटे म्हणाला. त्यावर घुले म्हणाला की, ‘आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने कंपनी बंद करू दिली नाही.’ यावर चाटे म्हणाला, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’
‘मारेकऱ्यांना कोणी पाठवले, खंडणी कोणासाठी होती?’
माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे.
हातपाय तोडा, पण...
माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते. परंतु, त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले, असेही वैभवी म्हणाली.