ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गव्हावर घाटेअळी, तांबेराचा प्रादुर्भावाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:11 IST2020-12-16T17:10:44+5:302020-12-16T17:11:47+5:30
ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गव्हावर घाटेअळी, तांबेराचा प्रादुर्भावाची शक्यता
बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने हरभऱ्यावर घाटेअळी आणि इतर पिकांवर तांबेरा व अन्य किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच, गहू व हरभरा पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र, ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
यावर्षी रबी हंगामात ३ लाख ३३ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, हरभऱा पिकांवर घाटेअळी व गहू ज्वारी पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असून, फवारणीही करणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरण असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो. त्यामुळे बुरशी नाशकाची फवारणी आवश्यक आहे. कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामकाज कृषी विभागाकडून सुरु आहे.
पाऊस झाल्यास पिकांना फायदा
ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठा पाऊस झाल्यास खरीप हंगामातील कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस झाल्यास रबी पिकांना फायदा होणार आहे.
वातावरण बदलानुसार शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक हाती लागावे यासाठी शेतकरी पिकांची काळजी घेत आहेत. मात्र, बदललेल्या वातावरणाचा फटका पिकांना बसणार असून, यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ज्वारी १५९७६९
हरभरा १३८०६७
गहू ३२५००
मका २८७९
ढगाळ वातावरणाचा हरभरा, गहू, ज्वारी, पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी. यामुळे कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखता होईल.
- सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) बीड