परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:38 IST2024-12-20T18:32:29+5:302024-12-20T18:38:53+5:30
या प्रकाराने परळी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण
परळी (बीड) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता का जमा करत नाहीस असे म्हणून येथील नगरपालिकेच्या कार्यालयातील घरकुल विभागात कार्यरत कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना आज सकाळी 11.45 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ( अजित पवार) माजी नगरसेवकाने जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली. या प्रकाराने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अन्वर मिस्किन शेख यांच्यासहित तिघांच्याविरुद्ध दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
परळी शहरातील पेठ मोहल्ला, राहुल नगर, कुरेशी नगर येथील घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली परंतु त्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. याचा जाब विचारण्यासाठी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) माजी नगरसेवक अन्वर मिस्कीन व काही कार्यकर्ते परळी नगरपालिकेत आले. उपमुख्यअधिकारी यांच्या टेबल जवळ बसले तेथेच नपचे घरकुल विभागातील कर्मचारी गायकवाड आणि माजी नगरसेवक तसेच सोबतच्या कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकामक झाली. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन घरकुल विभागाचे इन्चार्ज अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण ही केली.
वाद वाढल्याचे पाहून परळी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नाव नोंदणी विभागाचे किरण उपाडे व जन्म नोंद विभागाचे श्री विकास जगतकर यांनी मध्यस्थी करत माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांना आवर घातला. कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली आहे.
परळी नगरपालिकेत राडा; माजी नगरसेवकाचा कर्मचाऱ्यासोबत वाद, कार्यकर्त्यांची कर्मचाऱ्यास केली मारहाण #beednews#marathwadapic.twitter.com/f04iMnbTCS
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 20, 2024
दरम्यान, कर्मचारी सिद्धार्थ भारत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी नगरसेवक अन्वर शेख, शेख अजिज इस्माईल, शहबाज सज्जाद बेग यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचां गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत. घटनास्थळास परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन , सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवर यांनी भेट दिली आहे.
कर्मचाऱ्याने उद्धट उत्तरे दिल्याने वाद
पेठ मोहल्ला व अन्य भागातील लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याची रक्कम गेल्या दीड महिन्यापासून जमा करण्यात आली नाही. त्यामुळे आपण उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्याकडे पाठपुरावा केला. आज नगरपालिकेत आलो असता घरकुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यात व कर्मचाऱ्यात वाद झाला.
- अन्वर मिस्कीन माजी नगरसेवक परळी