' सिनेस्टाईल ' दागिने लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:02 IST2018-10-26T15:58:31+5:302018-10-26T16:02:58+5:30
‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

' सिनेस्टाईल ' दागिने लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात
बीड : घरासमोर झाडू मारणाऱ्या व रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे दागिने दुचाकीवरून येत ‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. गुरूवारी ही कारवाई करण्यात आली.
शेख जुबेर शेख अब्दुल (२० रा.मसरतनगर) व अमीर खान अकबर खान (रा.इस्लामपुरा) अशी पकडलेल्या दोन लुटारूंची नावे आहेत. २० सप्टेंबर रोजी श्रीराम नगर भागात अश्विनी रमेश लाखे या घरासमोर झाडू मारत होत्या. याचवेळी हे दोघे तिथे दुचाकीवरून आले. आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी लाखे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पोबारा केला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली होती.
त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपासाची चके फिरविली. शिवाजीनगर ठाण्याचे पोउपनि आर.ए.सागडे यांनी याचा तपास लावला. दोघांनाही ताब्यात घेऊन शिवाजीनगर ठाण्यात हजर केले. चौकशीत त्यांनी यापूर्वी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर पोनि शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागडे व त्यांच्या पथकाने केली.