केजमध्ये सीआयडीचे पथक तीन तास ठाण मांडून; सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सखोल तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:45 IST2024-12-26T19:45:18+5:302024-12-26T19:45:55+5:30
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप फरार असलेल्या तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे सीआयडी समोर आव्हान

केजमध्ये सीआयडीचे पथक तीन तास ठाण मांडून; सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सखोल तपास
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : राज्यभर गाजलेले सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण अन् हत्या प्रकरण आणि मस्साजोगशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे गेला आहे. दरम्यान, आज, गुरुवारी दुपारी पुणे येथील सीआयडीच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यांनी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे तब्बल तीन तास सरपंच संतोष देशमुख हत्येच्या तपासासंबंधी बैठक घेतली. यात सीआयडीच्या स्थानिक आणि वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सध्या सीआयडी करीत आहे. त्या निमित्ताने पुणे येथील सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे केजमध्ये दाखल झाले. आज दुपारी बोरूडे यांनी सीआयडीचे पुणे येथील पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली, पुणे येथील सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचेसह सीआयडी अधिकाऱ्याची गुरुवारी दुपारी दिड वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत तब्बल तीन तास बैठक घेण्यात आली. या बैठकीतील सविस्तर माहिती समजू शकली नसली तरी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अद्याप फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करणे हे सीआयडी अधिकाऱ्यां समोर पहिले आव्हान आहे.
आजपर्यंच्या तपासाचा आढावा घेतला
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्या नंतर हा पहिल्यांदा हा तपास स्थानिक पोलीस अधिकारी, नंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांचेकडे तर शेवटी सीआयडी अधिकाऱ्यांकडे हा तपास आला आहे. आजपर्यंत झालेल्या तपासाच्या माहितीचा आढावा ही या बैठकीत घेण्यात आला.
गावकरी व कुटुंबीय नाराज
सीआयडीचे अधिकारी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गुरुवारी दुपारी येणार असल्याचा निरोप त्यांना गेल्यामुळे दिवसभर हे सर्वजण त्यांची वाट पाहत बसले होते. परंतु शेवटी पाच वाजण्याच्या दरम्यान सीआयडीचे अधिकारी पीडित कुटुंबियांना न भेटताच गेल्यामुळे गावकरी आणि कुटुंबीय नाराज झाले आहेत.
सिसिटीव्ही फुटेजची मागणी
आवादा ऍनर्जी कंपनीचे सुरक्षा रक्षक अशोक भगवान सोनवणे यांना दि. 6/12/2024 रोजी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले व इतर तीन आरोपीनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दि. 6/12/2024 रोजी ते पोलिसात गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्याच दिवसाच्या दुपारी 3 ते रात्री 2 वाजेपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे व भैय्या सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक, केज यांचेकडे दि. 15 रोजी केली आहे. परंतु सर्व फुटेज आम्ही सीआयडीकडे दिलेले आहेत त्यांच्याकडून घ्या, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे.
शिक्षकांनी दिला पाच लाखाचा धनादेश..
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्यात गाजले असून बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी देशमुख कुटुंबाला मदतीचा हात म्हणून 5 लाख 13 हजार 511 रुपयाचा निधी जमा करून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचेकडे बुधवारी दिला आसल्याची माहिती विष्णू यादव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक
शनिवारी बीड येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन कारण्यात आले आहे. याच्या नियोजनासाठी केज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय, सर् धर्मियांची बैठक झाली. केज तालुक्यातील प्रत्येक गावातून सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे.