मुले मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती, खेळता-खेळता सापडला खजिना! १९४१ सालची चांदीची नाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:57 IST2026-03-01T05:57:15+5:302026-03-01T05:57:39+5:30
शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर काही मुले पायासाठी खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानक माती बाजूला झाली आणि मुलांना एक मातीचे गाडगे दिसले.

मुले मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती, खेळता-खेळता सापडला खजिना! १९४१ सालची चांदीची नाणी
- नितीन कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा (जि. बीड) : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एका घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना १९४१ सालची जुनी चांदीची नाणी भरलेला हंडा सापडला असून काही क्षण मुलांनी नाण्यांनी आपले खिसे भरून घेण्याची हौस फेडून घेतली.
शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर काही मुले पायासाठी खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानक माती बाजूला झाली आणि मुलांना एक मातीचे गाडगे दिसले. त्यातून नाणी बाहेर पडल्याने मुलांनी ती खेळण्याचे पैसे समजून खिशात भरली आणि आनंदात मुले घरी निघाली. दरम्यान, ही बाब संबंधित जागा मालकाला समजताच त्यांने मुलांना थांबवून दमदाटी करत त्यांच्याकडील नाणी एकत्र करून पुन्हा गाडग्यात भरून तो खजिना सुरक्षित ठिकाणी ठेवला.
पुरातत्त्व विभागाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी आणि संबंधित नाणी शासनदरबारी जमा करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सापडलेली नाणी ही चांदीची असून त्यावर ‘वन रूपी इंडिया १९४१’ असा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याचे वजन ४ ते ५ किलो असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.