चाईल्ड पॉर्नोग्राफी; १६ व्या वर्षी केला व्हिडिओ फॉरवर्ड, १९ व्या वर्षी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 11:45 IST2022-07-28T11:43:46+5:302022-07-28T11:45:39+5:30
बीड जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची पाच प्रकरणे उजेडात आली होती.

चाईल्ड पॉर्नोग्राफी; १६ व्या वर्षी केला व्हिडिओ फॉरवर्ड, १९ व्या वर्षी अटक
बीड : चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात अल्पवयात केलेल्या चुकीची शिक्षा तारुण्यातही भोगावी लागू शकते, याचा प्रत्यय २७ जुलैला आला. १६ व्या वर्षी फॉरवर्ड केलेल्या व्हिडिओमुळे १९ व्या वर्षी एका युवकास अटक करण्यात आली.
जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची पाच प्रकरणे उजेडात आली होती. सायबर सेलकडून त्याचा तपास सुरू आहे. शिवाजीनगर ठाण्यात २५ जून रोजी दाखल गुन्ह्यात एका १९ वर्षीय युवकास २७ जुलैला सायबर सेलने ताब्यात घेतले. १६ मे २०२० रोजी दोन अश्लील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन त्याने फॉरवर्ड केले होते. ही बाब राज्य सायबर विभागाच्या नजरेतून सुटली नाही. दरम्यान, गुन्हा घडला त्यावेळी युवक १६ वर्षांचा होता. सध्या तो १९ वर्षांचा असून डी. फार्मसी.चे शिक्षण घेतो. फॉरवर्डच्या एका चुकीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. त्यामुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य देखील धोक्यात आले आहे.
सुधारगृहात रवानगी
२७ रोजी सायबर विभागाने या युवकास ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्यास सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती पो.नि. आर. एस. गायकवाड यांनी दिली.