ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:25 IST2019-02-17T00:25:15+5:302019-02-17T00:25:57+5:30
घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली.

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
अंबाजोगाई : घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली.
कन्हैय्या गोविंद घाडगे (वय २) असे त्या बालकाचे नाव आहे. पाणी टंचाई असल्याने कन्हैय्याचे वडील गोविंद घाडगे यांनी शेतातून ट्रॅक्टरमध्ये पाणी आणून तो ट्रॅक्टर घरासमोर उभा केला. सकाळी ८ वाजता कन्हैय्या आणि इतर तीन मुले ट्रॅक्टरवर खेळू लागले. त्याचवेळी कन्हैय्याचा धक्का लागल्याने गियर हलला आणि ट्रॅक्टर उतारावरून पुढे सरकू लागले. यामुळे घाबरलेल्या कन्हैय्याचा तोल जात तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे ९.१५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कन्हैय्या ट्रॅक्टरखाली जात असल्याचे पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी धावलेले जनार्दन घाडगे हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.