"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:45 IST2025-02-05T16:32:29+5:302025-02-05T16:45:49+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचे कौतुक केले.

"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक
CM Devendra Fadnavis:बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे देखील काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांचे जोरदार कौतुक केलं आहे. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. या कामामुळे आमदार सुरेश धस यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.
"या प्रकल्पाला २०२२ मध्ये आमच्या सरकारने सुप्रमा दिली. या प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली आहे. कारण सुरेश धस एकदा मागे लागले तर ते डोके खाऊन टाकतात, हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
"२०१४-१५ मध्ये दुष्काळाच्या काळात आपल्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावे पाणीदार झाली. उच्च न्यायालयाच्या समितीने देखील इतक्या वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढली असल्याचे सांगितले. मात्र, मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करायचे असेल तर जलसंधारणाच्या कामाबरोबरच जोपर्यंत पश्चिम वाहिन्यांचे पाणी समुद्रात जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणत नाही, तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही," मुख्यमंत्री असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची कणखर भूमिका सर्वांना आवडली - सुरेश धस
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण जी संतोष देशमुख प्रकरणांत कणखर भूमिका घेतली ती सर्व जनतेला आवडली आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला सोडणार नाही यावर सर्व जनतेचा विश्वास आहे," असं सुरेश धस यांनी म्हटलं.