बीड : भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल होते. तो सहा दिवसांपासून फरार होता. छत्रपती संभाजीनगरहून तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला (उत्तर प्रदेश) गेला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरुरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर लगेच वनविभागाने खोक्याच्या घरी छापा मारून तपासणी केली. यात वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता; परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत होता. या सर्व प्रकारामुळे पोलिस करतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
पुणे, अहिल्यानगरमध्ये मुक्कामघटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर खोक्याने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठले. तेथून पुणे आणि मग छत्रपती संभाजीनगरला आला. मंगळवारी दुपारी १२ वाजता खोक्या ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. तेथे उतरून लपण्याच्या तयारीत असतानाच यूपी पोलिसांनी त्याला पकडले. त्याची सर्व माहिती बीड पोलिसांनी पुरवली होती.
पाच दिवसांपासून रात्रभर जागरणबीड पोलिसांचे पथक खोक्याच्या मागावर होते. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह एलसीबीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, दीपक खांडेकर, बाळू सानप आणि सिद्धार्थ मांजले हे लोक खोक्याच्या मागावर होते. लॉज, हॉटेल्स रात्रभर फिरून तपासले. प्रवासात झोप आणि रात्रभर जागरण अशी त्यांची दिनचर्या होती. काँवत हे त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करत होते.
चौकडा शर्ट अन् पाठीवर पिशवीगळ्यात किलोभर सोने, पैशांची उधळण, व्हीआयपी वाहनांमधून फिरण्यासह हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे व्हिडीओ खोक्याचे व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने सोने काढले. तसेच पैसे घेऊन तो एक चौकडा शर्ट घालून प्रयागराजला पोहोचला. सोबत पाठीवर एक पिशवी होती. आठवडाभर तेथेच थांबण्याची तयारी त्याची होती.
सुनावणीच्या दिवशीच अटकखोक्याने १० मार्च रोजी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी होणार होती; परंतु त्या आधीच त्याला बेड्या ठोकल्या.
मदत करणाऱ्यांवरही कारवाईखोक्या भोसले हा प्रयागराजमध्ये असल्याचे समजले. बीड आणि प्रयागराज पोलिस यांनी समन्वय साधून त्याला अटक केली. ट्रांझीट रिमांड आणि इतर कायदेशीर कारवाई करून त्याला बीडमध्ये आणले जाईल. त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करू.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड