"त्यांना दोन-तीन वेळेस बोललो, आता त्यांच्याशी CM बोलतील"; मंत्री बावनकुळेंनी टोचले सुरेश धसांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:27 IST2025-01-06T12:11:45+5:302025-01-06T12:27:36+5:30

मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी समज दिली आहे.

Chandrashekhar Bawankule warns BJP MLA Suresh Dhas who accused Dhananjay Munde | "त्यांना दोन-तीन वेळेस बोललो, आता त्यांच्याशी CM बोलतील"; मंत्री बावनकुळेंनी टोचले सुरेश धसांचे कान

"त्यांना दोन-तीन वेळेस बोललो, आता त्यांच्याशी CM बोलतील"; मंत्री बावनकुळेंनी टोचले सुरेश धसांचे कान

Chandrashekhar Bawankule on Suresh Dhas: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. पुण्यातल्या मोर्चातही धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस यांचे कान टोचले आहेत. सुरेश धस यांनी जाहीरपणे कोणतीही वक्तव्ये करू नयेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडचे राजकारण पेटलं आहे. सुरेश धस यांनी वाल्मीक कराडच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.  सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे सुरेश धस यांनी केला. त्यानंतर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज दिली आहे. तसेच आरोपीला कडक शासन होणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं.

"सुरेश धस यांना आधी दोन-तीन वेळेस मी बोललो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलतील. पण त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांनी सरकारमध्ये मांडल्या पाहिजेत. सरकारच्या संदर्भात सरकारमध्ये मांडायला पाहिजे आणि पक्षाशी संदर्भात माझ्याकडे मांडल्या पाहिजेत. पण सार्वजनिक व्यासपीठावर कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे गेली पाहिजे. सरकारने जर कारवाई केली नाही तर तो पुढचा प्रश्न आहे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

"पण बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकारच्या चौकशी लावल्या आहेत. अशी एकही चौकशी नाही जी बीडच्या प्रकरणात सुरू नाहीये. देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील. १०० टक्के आरोपीला कडक शासन होईल," असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
 

Web Title: Chandrashekhar Bawankule warns BJP MLA Suresh Dhas who accused Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.