शेतकऱ्यांचे नशीब बदलणार केंद्र-राज्य सरकार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:32 IST2025-11-08T12:30:45+5:302025-11-08T12:32:32+5:30
शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे

शेतकऱ्यांचे नशीब बदलणार केंद्र-राज्य सरकार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानांची ग्वाही
परळी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ग्रामीण भागातील शेतीमालाला कमी भाव मिळण्याची आणि मोठ्या शहरांत जास्त भाव मिळण्याची दरी कमी करण्यासाठी सरकारी एजन्सींमार्फत थेट बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असल्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्टतर्फे आयोजित भव्य शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास मराठवाडा व मराठवाड्याबाहेरूनही मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सुखी व समृद्ध करण्याचा संकल्प राबवला जात आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी राहणार आहे. कोणत्याही घरात गरिबी राहू देणार नाही. नुकसानीची भरपाई देताना ते म्हणाले, झालेल्या नुकसानीचा एक-एक रुपया शेतकऱ्यांना दिला जाईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन-कापूस यांसारख्या पिकांबरोबरच फळे, फुले आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
बियाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत विचार सुरू आहे. ग्लोबल विकास ट्रस्ट व मयंक गांधी यांनी केलेले कृषी प्रयोग देशभर राबवण्यात येतील आणि केंद्र सरकार या संस्थेसोबत मिळून शेतकऱ्यांचे नशीब बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या परिसरात कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेतीविषयक अवजारे व साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते, या ठिकाणी शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी होती. कार्यक्रमास जलनायक मयंक गांधी, विक्रम श्रॉफ, रवी झुनझुनवाला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डॉ. इंद्रमणी त्रिपाठी, डॉ. हरिश्चंद्र वंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग रुद्राक्ष यांनी केले.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
या मेळाव्याचे खास आकर्षण ठरले ते केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून खाली उतरून थेट शेतकऱ्यांशी साधलेला संवाद. त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. उपस्थित शेतकऱ्यांनी मी शेतकरी, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, असा उल्लेख असलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि कृषिमंत्र्यांनीही तीच टोपी परिधान करून शेतकऱ्यांमध्ये मिसळून गेले.
परळीबद्दल लोक चुकीचे बोलतात
जलनायक मयंक गांधी म्हणाले, बाहेर परळी शहराबद्दल लोक चुकीचे बोलतात, पण परळीकरांसारखे चांगले लोक देशात कुठेही नाहीत. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर फळे-फुले शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले.