अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 18:50 IST2019-05-11T18:49:10+5:302019-05-11T18:50:29+5:30
आरोपी काही दिवसांपासून गावातीलच एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होते.

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
माजलगाव (बीड) : तालुक्यातील पवारवाडी येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी (दि.११ ) शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील सचिन उर्फ विठ्ठल रुस्तुम धुमाळ, चंद्रकांत अंकुश यादव, कुंडलिक भीमराव धुमाळ हे मागील काही दिवसापासून गावातीलच एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होते. शिकवणी क्लासला जाताना वरील आरोपीने शहरातील नवीन बसस्थानकात उभा असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढत विनयभंग केला. माझ्या चिठ्ठीचे उत्तर का दिले नाहीस ? असे म्हणून तिच्या अंगावर असिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या वडिलांना सांगितला.
यामुळे पालकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, कलम ३५४ नुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. बिराजदार हे करत आहेत.