भ्रष्टाचार प्रकरणी आष्टी तालुक्यात ३ शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:31 IST2019-04-26T00:29:31+5:302019-04-26T00:31:21+5:30
सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले.

भ्रष्टाचार प्रकरणी आष्टी तालुक्यात ३ शिक्षक निलंबित
आष्टी : सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले.
मोराळा येथील जि. प. शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक विजयकुमार पालवे यांनी हंगामी वसतिगृह बंद असतानाच्या कालावधीचे देयक तयार करुन ४८ हजार १७४ रुपयांची उचल करुन अपहार केला. यामुळे चौकशीअंती पालवे यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुर्शदपूर केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास गहिनीनाथ वायबसे हे मुख्याध्यापक पदावरुन कार्यमुक्त झालेले असतानाही प्राथमिक शाळा डाग येथील कार्यभार न देता त्या शाळेच्या खात्यावरील ६० हजार रुपये उचलून आर्थिक अनियमितता केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील मिरडवाडी येथील तत्कालीन मुख्याध्यापक कल्पना बन्सी ढाकणे यांनी हंगामी वसतिगृह बंद असताना त्या कालावधीचे देयक तयार करुन शासकीय रक्कम ३२ हजार ६२ रुपयांची उचल केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली. याप्रकरणी त्यांनाही निलंबित करण्यात आल्याचे आदेश जारी झाले आहेत.